• Twitter
  • Facebook
  • Google+
  • Instagram
  • Youtube

Wednesday, 19 September 2018


तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना
तू वायफायचा पासवर्ड देशील
मी तांब्याभर पाणी देईन
बसायला चटई टाकीन.

तू विचारशील काय काम काढलं?
मी म्हणेन बरं केलं आलात
कालच आठवण काढली होती.

तुझी बायको बघत बसेल
अनोळखी वाटतील सगळे तिला.
ती विचारेल दबकत
थंड घेणार की गरम?
माझी बायको मात्र
ओळख नसतानाही जवळची वाटेल..
बशीत सांडेपर्यंत चहा भरेल..

तुझी मुलं गेम खेळत असतील
आणि माझी मुलं
त्यांच्या मांडीवर जाऊन खेळतील..

तुला चिंता रात्रीच्या जेवणाची,झोपण्याची..
मी मात्र देणेकरी शोधीन
खाटखुट देशी मसालेदार रस्सा असेल..

दाटीवाटीने अंथरून टाकीन
गप्पा मारत रात्र जाईल
सुख दुःख वाटता येईल..

पाहुणे जाताना तुला फक्त
थँक्स म्हणतील
तुही गॅलरीत उभा राहून
बाय बाय करत राहशील
बायको फार सुंदर हसेल तुझी..
तीही तुला मिठी मारून दाद देईल
तुझ्या पाहुनचाराला

माझ्या घरात मात्र
सगळ्यांचे डोळे भरतील
लेकरं बायको आशीर्वाद घेतील
पुन्हा यायचंच म्हणून
हक्काने वचन घेतलं जाईल..

नजरेच्या टप्प्या पलीकडे गाडी
जाईपर्यंत
निरोपाची भाषा
हलत्या हाताला असेल
कळ असेल काळजात फार ओली
हुंदके गातील प्रेमाची गाणी

फरक एवढा साधा आहे मित्रा
तू कुठे राहतोस माहीत नाही
पण मी भारतात राहतो
एवढं नक्की..

नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली
7020909521

0 comments:

Post a Comment