• Twitter
  • Facebook
  • Google+
  • Instagram
  • Youtube

Wednesday, 19 September 2018

वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम युती म्हणजे सकारात्मक राजकीय परिवर्तनाची नांदीच !!


वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम युती म्हणजे सकारात्मक राजकीय परिवर्तनाची नांदीच !!
वंचित बहुजन आघाडी आणि अॉल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल अर्थात एआयएमआयएम या दोन्ही पक्षांनी महाराष्ट्रात युतीची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात भुकंप झाला. काहींनी नाराजी तर काहींनी युती बाबत आनंद व्यक्त केला आहे. खरं तर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार अॅड बाळासाहेब आंबेडकर आणि एआयएमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असादुद्दीन ओविसी यांनी पुढाकार घेऊन 2019 व त्यापुढील निवडणूकांसाठी राजकीय युतीचा धाडसी निर्णय घेतला आहे.हा निर्णय म्हणजे वंचित समूहासाठी सकारात्मक राजकीय परिवर्तनाची नांदीच ठरणार आहे म्हणून या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
या निर्णयामुळे कॉंग्रेस नाराज झाली.कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नाराजी व्यक्त करून एआयएमआयएमशी भारिप बहुजन महासंघाने युती करू नये,युतीचा फेर विचार करावा.कॉंग्रेस भारिप बहुजन महासंघा सोबत युती करण्यास इच्छुक आहे असे मिडीयातील बातम्या वरून समजते.
देशात संविधान विरोधी, ओबीसी-बहुजन-अल्पसंख्याक व्देषी व शेतकऱ्यांना मारक असे कार्पोरेट -भांडवलदार धार्जिणे मोदी सरकार घालविण्यासाठी एक पावूल पुढे टाकत 20 जून रोजी अॅड बाळासाहेब आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसाला युतीचा प्रस्ताव दिला होता.गेल्या 70 वर्षात सत्ता-संपत्ती आणि स्वाभिमानापासून वंचित असलेल्या समूहांपैकी धनगर -2,माळी-2,ओबीसी-2,लहान ओबीसी-2, मुस्लिम-2,अन्य-2 अशा एकुण 12 जागांचा प्रस्ताव कॉंग्रेसला दिला होता. परंतु गेल्या दोन महिन्यांत या प्रस्तावावर कॉंग्रेसने साधा ब्र शब्द सुध्दा काढला नाही. उलट मध्यंतरी कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी,'प्रकाश आंबेडकर यांच्या मागण्या अवास्तव असतात, त्यावर विचार करणे शक्य नसते," अशी बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावाची जणू खिल्लीच उडवली होती. अशीच भूमिका अशोकराव चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. खरंतर या नेत्यांच्या अहंकाराला दुर्लक्षित करून " आम्ही कॉंग्रेस वर्किंग कमेटी CWC च्या निर्णयाची वाट पाहू !!" अशी कॉंग्रेस युतीसाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती.मात्र कॉंग्रेसच्या झुलवत ठेवणाऱ्या मानसिकतेचा बाळासाहेबांना अभ्यास असल्यामुळे वेळ न घालवता एआयएमआयएमशी युतीचा निर्णय जाहीर केला.
ज्यांनी दोन महिन्यांत चिक्कार शब्द उच्चारला नाही मात्र युतीची घोषणा होता बरोबर कॉंग्रेसमध्ये राजकीय भूकंप होणे सहाजिकच होते. आणि झालेही तसेच." भारिप बहुजन महासंघाचा महाआघाडीत समावेश करण्यासाठी कॉंग्रेसची चर्चेची तयारी आहे ?" अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी लागलीच मिडीयाला दिली.
खरेतर युती बाबत निर्णय घेण्याचा अधिकार अशोकराव यांना नाही किंवा प्रदेश कमेटीला सुध्दा नाही. तर कॉंग्रेस हायकमांड कडून निर्णय होत असतो. मुळात प्रादेशिक पक्ष,राजकीय आघाड्यांशी युती करण्याचा निर्णय हा कॉंग्रेस हायकमांडला सुध्दा घ्यायचा नाही.हा पुर्वीचाच अनुभव आहे. कॉंग्रेसला प्रादेशिक पक्ष, छोटे पक्ष- राजकीय आघाड्यांशी युती करण्यात स्वारस्य नाही हे त्यांनी गुजरात आणि कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले आहे. या दोन्ही राज्याच्या निवडणूकीच्या वेळी सर्व विरोधी पक्ष-आघाड्यांनी मोदी विरोधात महाआघाडी करून लढू !! अशी भूमिका घेतली होती. यासाठी समविचारी सेक्युलर प्रादेशिक आणि डाव्या पक्षांनी कॉंग्रेस पक्षाकडे अगदी शुल्लक 15-20 जागांची मागणी केली होती. शेवटपर्यंत युतीसाठी झुलवत ठेवण्याच्या आपल्या रणनीती नुसार सेक्युलर पक्षांच्या मागणीला कॉंग्रेसने अक्षरशः वाटाण्याच्या अक्षता लावल्या. उलट प्रादेशिक पक्ष, स्थानिक आघाड्यांनी आमच्या मागे गपगुमान फरफटत यावे अशी परिस्थिती कॉंग्रेसने दोन्ही राज्यात निर्माण केली.परिणामी कॉंग्रेस दोन्ही राज्यात हरली.आता राजस्थान आणि मध्यप्रदेशातील विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्याठिकाणी सुध्दा समविचारी पक्षांसोबत युती करण्याची मानसिकता कॉंग्रेसची नाही. कारण काय असेल तर कॉंग्रेसला असे वाटते की,प्रादेशिक पक्ष किंवा राजकीय आघाड्यांशी युती केली तर त्या छोट्या पक्षांना ताकत दिल्यासारखे होईल व आपला असलानसला जनाधार घालवून बसू !! अशी कॉंग्रेस पक्षाला भीती वाटते !! हि खरी गोम आहे !! कॉंग्रेस पक्षाने स्वतः चे प्रामाणिक मुल्यांकन केल्यास असे दिसून येते की, प्रत्येक राज्यात कॉंग्रेस कमकुवत झाली आहे आणि आपला पुर्वीचा जनाधार(वैभव) विविध कारणांमुळे घालवून बसली आहे. अशावेळी प्रादेशिक पक्ष,आघाड्या प्रबळ झाल्या आहेत.
यासर्व बाबी बाळासाहेब आंबेडकर यांनी गुजरातच्या निवडणूकी पासून आता पर्यंतच्या कालावधीत जाहिरपणे, पत्रकार परिषदेत बोलून दाखवल्या आहेत.महाराष्ट्रात कॉंग्रेस नेहमीच्या कुटील रणनिती नुसार आपली फरफट करेल आणि वेळेवर आपला घात करेल हे बाळासाहेबांना चांगलेच ठाऊक होते.त्यामुळे कॉंग्रेस कडून जास्त अपेक्षा न ठेवता आपल्या ताकतीचा विस्तार केला. गेल्या ७० वर्षात प्रस्थापित घराण्यांनी सत्ता, संपत्ती, आणि स्वाभिमानापासूनवंचित ठेवलेल्या धनगर समाज,आदिवासी भटक्या विमुक्त जाती जमाती, मोठा ओबीसी समूह व अगदी मायक्रो लहान ओबीसी समूह,अल्पसंख्याक मुस्लिम समूहांना,तसेच विविध समाजिक संघटनांना सोबत घेऊन "वंचित बहुजन आघाडीची " स्थापना केली.आघाडीच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्हे अक्षरशः पिंजून काढले.वंचित समूहाला विश्वास दिला,विश्वास संपादन केला. जिल्हाजिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळाला.
"वंचित बहुजन आघाडीचा" विस्तार करण्याची प्रक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी निरंतर सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासदार ओविसी यांच्या एमआयएम पक्षासोबत युती झाल्याचे जाहीर केले आहे. लागलीच २अॉक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये शक्ती प्रदर्शन सुध्दा हे दोन्ही घटक करणार आहेत. येणाऱ्या काळात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व अन्य काही सामाजिक संघटना वंचित बहुजन आघाडीसोबत जुळलेल्या पाहण्याचे औत्सुक्याचे ठरेल !!
राजकीय पटलावर बाळासाहेब आंबेडकरांची शक्ती होतीच व ती आता जास्त प्रमाणात वाढलेली आहे आणि वाढण्याचा ओघ सुरूच आहे हे सर्व राजकीय पक्षांना माहीत असून त्याची दाहकता ते समजून आहेत.बाळासाहेबांनी खासदार ओविसी यांच्या एमआयएम पक्षासोबत युती केली म्हणून कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व अन्य काही मंडळींनी बाळासाहेब आंबेडकरांवर टिकेची झोड ऊठवली आहे. एमआयएम सोबत युती केली म्हणून यांची नाराजी नसून अलिकडच्या काळात बाळासाहेबांचा वाढलेला "प्रभाव" हेच या सर्व पक्षांचे अवघड जागेवरचे दुखणे आहे हे समजून घेतले पाहिजे. या टिकाकारांच्या पोटात भितीचा गोळा ऊठला आहे. हे पोटशूळ येणाऱ्या काळात आणखी वाढेल. तसतशी बाळासाहेब आंबेडकरांवरची टिकेची धार आणखी तेज केल्या जाईल. हिंदू विरुद्ध मुस्लिम व हिंदू विरुद्ध दलित अशा धृवीकरणातून बाळासाहेबांना अलग पाडण्याच्या अनेक खेळ्या उक्त टिकाकार करणार आहेत.अशा परिस्थितीत बाळासाहेब हे राजकीय सारीपाटावर अगदी संयमाने आणि चाणाक्षपणे परिस्थिती हाताळणार आहेत यात दुमत नाही. एकमात्र लक्षात ठेवले पाहिजे की,शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे या टिकाकारांपेक्षा कॉंग्रेस पक्षाचेच यामध्ये जास्त नुकसान होणार आहे. कॉंग्रेस जर केंद्रात सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहत असेल तर त्यांनी डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरीची भूमिका घेतल्यास ते त्यांनाच महाग पडेल. यातून कॉंग्रेस काही धडा घेते की आत्मघातीपणा करते हे येणाऱ्या काळात दिसेलच ! तुर्त बाळासाहेब आंबेडकरांची " वंचित बहुजन आघाडी" आणि " एमआयएम" ची युती वंचित समूहाच्या सत्तेची पायाभरणी असून हि युती सकारात्मक राजकीय परिवर्तनाची नांदीच ठरणार आहे !!
सुरेश शिरसाट, अकोला- ८९९९५५८९४९

0 comments:

Post a Comment

Contact

Get in touch with me


Adress/Street

12 Street West Victoria 1234 Australia

Phone number

+(12) 3456 789

Website

www.johnsmith.com